थाॅमस हॅरीसच्या पुस्तकात एक गंमतीशीर गोष्ट मला आढळली. ज्याकाळी घरात चार पाच भावंडे असत, त्या काळातील ती गोष्ट असावी. गोष्ट साधारण अशी होती की: एका आईने मुलांसाठी लाडू बनवले होते. संध्याकाळी मुले खेळून परतल्यावर तिने पाच लाडू काढून डायनिंग टेबलवरच्या बशीत ठेवले व मुलांना ते घ्यायला सांगितले. मोठ्या चौघांनी आपापल्या वाट्याचा लाडू उचलला. चार वर्षांचा चिंटू जेव्हा लाडू उचलायला पोचला तेव्हा एक लाडू शिल्लक होता. पण तो मोडला होता. तो मोडका लाडू बघून चिंटूला वाईट वाटले. त्याच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आणि रडत रडत त्याने काय केले, माहीत आहे का? तो फुटका लाडू त्याने फेकून दिला!
तो ‘डिसअपाॅयमेंट’ला ‘डिझॅस्टर’ समजून बसला. थोड्याशा वाईट अवस्थेला त्याने आपत्तीचे स्वरुप दिले.
चिंटूने जे लाडवाबाबत केले ते तुम्ही-आम्ही मोठी मंडळी आमच्या नातेसंबंधांबाबत किवा इतर महत्त्वाच्या गोष्टींबाबत करतो का? असा प्रश्न थाॅमस हॅरीस उभा करतो. हे वाचताना मला जाम हसू आले, कारण मीदेखील अनेकदा असा वागलेलो आहे.
पण मुळात माणूस असे का वागतो हा प्रश्न आहे. चार वर्षाच्या चिंटूचे ठिक आहे. पण माझ्यासारखी मोठी माणसे आपल्या वाट्याला आलेला फुटका लाडू फेकून देऊन स्वतःच्या जास्तीच्या नुकसानीचे वर्तन का करतात?
थाॅमस हॅरीसचे उत्तर आहे, ‘आपल्यातील बालकाने आपल्यातील विचारी अवस्थेवर मात केल्यामुळे!’ हा जो आपल्यातील बालक आहे, तो म्हणजे आपण ज्याला ‘पोरकटपणा’ किंवा चाईल्डीशपणा म्हणतो, तो नव्हे. इथे थॉमस हॅरीसने वापरलेला ‘बालक’ हा शब्द ‘ट्रांझॅक्शनल ॲनॅलिसीस’ मधला आहे!
ट्रांझॅक्शनल ॲनॅलिसीसविषयी सर्वात पहिल्यांदा मी वाचले ते माझ्या पोस्टग्रॅज्युएशनच्या काळात. ते देखील फारसे नाही. त्यावेळी ते कळलेदेखील नाही. त्यानंतर माझ्या एका सिनीयरने मला ‘गेम्स पीपल प्ले’ हे पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला आणि मुंबईच्या फूटपाथवर बसलेल्या एखाद्या जुनी पुस्तके विकणाऱ्याकडे ते हमखास मिळेल असेही सांगितले. पण मला ते सापडले नाही. आणि मी विसरून गेलो.
पुढे कधीतरी मला डॉ. राजेंद्र बर्वे यांचे संवादावरील पुस्तक मिळाले आणि विस्मृतीत गेलेले ट्रांझॅक्शनल ॲनॅलिसीस पुन्हा आठवणीत आले. त्यात सुरुवातीलाच एक उदाहरण होते.
प्रश्न: किती वाजले?
या प्रश्नाचे तुम्ही काय उत्तर द्याल असा प्रश्न होता. सहाजिक आहे, तुम्ही म्हणाल, ‘अमूक वाजून अमूक मिनीटे झाली!’
पण हे तर एक उत्तर झाले. पण ‘किती वाजले?’ या प्रश्नाला आणखी दोन उत्तरे देता येतात!
एक उत्तर: कालच्या इतकेच!
आणि दुसरे उत्तर: तुमचे तुम्ही बघा ना. मला का विचारता?
एकाच प्रश्नाची ही तीन उत्तरे काय दाखवतात?
आपल्यात असलेल्या तीन प्रवृत्ती. किती वाजले, या प्रश्नाला आलेले पाहिले उत्तर हे विचारी माणसाचे उत्तर आहे. दुसरे उत्तर हे आपल्यातील बालक प्रवृत्तीचे उत्तर आहे तर तिसरे उत्तर हे आपल्यातील खाष्ट बापाचे उत्तर आहे.
आपल्या सगळ्यांमध्ये या तीन अवस्था असतात. या अवस्थांची जाणीव सर्वात आधी डॉ. एरीक बर्न यांना एका पेशंटशी बोलताना झाली. एक वकील त्यांच्याकडे पेशन्ट म्हणून येत असे. तो त्याच्या व्यावसायिक जीवनात यशस्वी वकील होता. पण डॉ.बर्न यांच्याशी बोलताना तो मध्येच एखाद्या लहान मुलासारखा बोलतोय असे, डाॅ.बर्न च्या लक्षात आले. त्यानंतर डॉ. बर्न बारकाईने लोकांच्या वर्तनाकडे पाहू लागले. त्यांना आढळले की लोक त्या वकीलासारखे बालक अवस्थेत जातात तर कधी खाष्ट बापाच्या अवस्थेत जातात तर कधी विचारी अवस्थेत जातात. या अवस्था बदलल्याचे माणसाच्या हावभावांवरून, बोलण्यावरून लक्षात येते.
डॉ. बर्न यांनी यावर सखोल विचार करून त्याचे विज्ञान विकसीत केले. आणि त्याची उपचार पद्धती बनवली.
आपल्या प्रत्येकात बालक (Child), पालक (Parent) आणि विचारी (Adult) असतात. आपण एकमेकांशी बोलत असताना, भांडत असताना, किंवा अबोला धरलेला असताना आपल्यातील कोण प्रभावी होतोय, यावर बारकाईने लक्ष ठेवणे फार रंजक आहे. त्यामुळे आपली भावना थोड्याशा प्रमाणात तरी नियंत्रित करण्यात मदत होते, असा माझा अनुभव आहे.
तसेच समोरची व्यक्ती या तीनपैकी कोणत्या अवस्थेतून बोलते आहे, हे समजून घेणे देखील रंजक आहे. फक्त ते मोठ्याने समोरच्याला ऐकवून तापलेल्या तेलात पाणी न ओतण्याचे पथ्य मात्र पाळा!