वर्ल्ड कप आणि मनोसंरक्षक पद्धती

Dr Anand Kale, Chhatrapati Sambhaji Nagar, Maharashtra<

शरीरावर जेंव्हा काही घातक जंतूंचा हल्ला होतो तेंव्हा शरीराची एक नैसर्गिक बचाव पद्धती असते. त्यात संरक्षक पेशी, अँटीबॉडीज आदी घटकांचा समावेश होतो .ज्याची प्रतिकार शक्ती जास्त (immunity) तो या जंतूंच्या हल्ल्याचा समर्थ पणे सामना करतो. करोना काळात या बद्दलचे आपले ज्ञान शतपटीने वाढले.

शरीराची जशी एक नैसर्गिक संरक्षक पद्धत असते तशी मनाची देखील असते.  ताण, अस्वस्थता,चिंता ,भय, दु:ख अशा त्रासदायक भावना पासून मनाला  संरक्षन देणाऱ्या पद्धतीला डिफेन्स म्याक्यानिझम (Defence mechanisms) असे म्हणतात. या संरक्षक पद्धती काही परिपक्व तर काही अपरिपक्व असतात. प्रत्येक व्यक्ती आपापल्या मनाच्या व व्यक्तिमत्त्वाच्या जडण घडणी नुसार या पद्धती वापरत असतो. ताणापासून आपले मन कोलमडून जाऊ नये यासाठी ही पध्दत काम करते.

वर्ल्ड कप फायनल मधे दारुण पराभव झाल्यानंतर निराशा, उद्विग्नता,राग, दोषारोपण आदी भावना अनुभूत करताना भारतीयांच्या या मनोसंरक्षक भिंतींची प्रचिती आली. सोशल मीडियावर लाखो प्रतिक्रियांचा पाऊस पडला. लोकांनी आपल्या भावना भरभरून व्यक्त केल्या. यातूनच ते वापरत असलेल्या मनोसंरक्षक पद्धती पुढे आल्या.

या वर्ल्ड कप फायनलचा अन् मनाच्या या खेळाचा हा एक किस्सा!

त्या दिवशीची ती संध्याकाळची कातरवेळ. दिवसभराचा प्रचंड उत्साह आता ओहोटीला लागलेला. पराभवाचे काळवंडलेले ढग भारतीय संघावर दाटलेले.

कॉलनीतल्या आबालवृद्धांनी आजची जय्यत तयारी सकाळ पासूनच केली होती. सोसायटीच्या कॉमन रुमला स्टेडियमचे स्वरूप आले होते. स्त्रिया, पुरुष आणि लहान मुले सगळे जमले होते. पेयांची आणि खाद्यपदार्थांची रेलचेल होती. काही जणांनी तर फटाके आणि मिठाई देखिल आणून ठेवली होती. प्रत्येक चेंडूनंतर तावातावाने चर्चा होत होत्या, आपली अभ्यासपूर्वक आणि भावनात्मक मते मांडली जात होती.

शेवटी नको तेच झालं.! ऑस्ट्रेलियाने धावसंख्या ओलांडून विजय मिळवला आणि सगळी कडे नैराश्य, संताप   आणि दुःखाचे वातावरण पसरले. .    काही मंडळीने आधीच तिथून काढता पाय घेतला पण बरेच जण बसून होते. मॅचनंतर पोस्टमार्टम सुरु झाले आणि त्यातून प्रत्येकाची मन संरक्षणाची ढाल पुढे आली.

“मला त्या मॅचबाबतीत अन् त्या क्रिकेट बद्दल काही बोलायचं नाही. मी त्याचा आता विचारही मनात आणणार नाही मी विसरलो आहे ते सगळ”

कोपऱ्यात बसलेला सतीश म्हणाला. सतीशला पराभवाचे दुःख तर आहेच परंतु यातून होणारा त्रास  तो एका विशिष्ट मनोसंरक्षण पद्धतीने  हाताळत आहे. मनातील अस्वस्थता कमी करण्यासाठी तो अस्वस्थ करणारे विचार विसरून जाण्याचा प्रयत्न करत आहे. या मनोसंरक्षक पद्धतीला repression किंवा दमण असे म्हणतात.  . वेदनादायक विचार अंतर्मनात दाबून ते विसरण्याचा प्रयत्न यात केला जातो. थोडक्यात  माणूस ते विसरण्याचा प्रयत्न करतो जे तो स्मरणात ठेऊ इच्छित नाही.

शेजारी बसलेल्या सुरेशचा  जवळचा मित्र रमेश याच्या मनात प्लेअर्स  बद्दल अतिशय राग आणि संताप आहे. ते योग्य खेळले नाहीत असे त्याचे स्पष्ट मत आहे. मनातल्या या रागामुळे तो अस्वस्थ होत आहे. पण हा राग योग्य नाही हा विचार त्याला अजून अस्वस्थ करत आहे. या  मनस्थितीला तोंड देण्यासाठी त्याचे मन ‘रिएक्शन फॉर्मेशन’ नावाची मनो संरक्षक पद्धत वापरते .यामध्ये व्यक्ती मनात येणार्या व अस्वस्थ  करणार्या भावनांच्या अगदी उलट भावना प्रकट करतो.रमेश आपल्या बोलण्यातून प्लेअर्स बद्दल राग न व्यक्त करता उलट सहानभूती प्रकट करतो. “किती छान खेळले आपले खेळाडू! फायनल पर्यंत अपराजित राहिले! हे अतिशय कौतुकास्पद आहे.” मनातल्या रागाचा त्रास होऊ नये म्हणून त्याच्या अगदी उलट भावना प्रकट करण्याचा हा प्रकार.

“फटके मारायला पाहिजेत त्या अंपायरला “सुहासचे स्पश्ट मत! “आऊट असताना देखील नॉट आऊट दिले त्या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला बुमराच्या चेंडूवर! “

येथे सुहास मनातला राग प्रोजेक्षण (projection) या मनो संरक्षक पद्धतीने हँडल करत आहे. रागामुळे अंपायरला मारण्याची मनात आलेली इच्छा चूक आहे हे त्याला माहित आहे पण त्यातून निर्माण झालेली ही बेचैनी (Anxiety) किंवा ताण कमी करण्यासाठी तो आपल्या चुकीच्या विचाराचे समर्थन करत आहे. त्यासाठी तो अम्पायरवर असे दोषारोपण करत आहे कि त्याने मुद्दाम फलंदाजाला नॉट आउट दिले आणि त्यामुळे भारताचा पराभव झाला. थोडक्यात सांगायचे झाले तर “दुसऱ्यावर खापर फोडणे”या प्रकारातील हा भाग आहे. याला प्रोजेक्शन किंवा दोषारोपण मनोसंरक्षक पद्धत असे म्हणतात.

उद्विग्न झालेला विकास म्हणाला “बरे झाले मॅच हरलो ते! आता पुढचे काही दिवस तरी या क्रिकेट मुळे जाणारा वेळ वाचेल. या क्रिकेटमुळे बाकीची सगळी कामं बंद झाली होती.” या ठिकाणी rationalization हा डिफेन्स मेकॅनिझम वापरला जात आहे .मनात निर्माण झालेला त्रागा काही अक्सेप्टेबल आणि वास्तविक (rational) विचार आणि भूमिका ठेऊन तो कमी करण्याचा प्रयत्न! आपण हरलो आहोत या गोष्टीमुळे निर्माण झालेले नैराश्य दुसरी एखादी रॅशनल गोष्ट मनामध्ये बाळगून कमी करण्याचा विकासचा वास्तविक प्रयत्न आहे. जी गोष्ट झाली ती चांगलीच झाली असे स्वत:ला समजावून मनाची समजूत काढण्याचा हा प्रयास !थोडक्यात सांगायचं तर “ कोल्ह्याला द्राक्षे आंबट”

सुमारे साठीच्या वयाचे रामराव आता पुढे सरसावले –“शेवटी हा खेळ आहे. हार – जीत तर होणारच. शेवटी क्रिकेटच्या खेळाचा विजय झाला हे मात्र नक्की.याशिवाय लॉ ऑफ अवरेज कधी तरी आपल्याला गाठणारच”. इथे intellectualization (बुद्धियुक्त स्पष्टीकरण) हा डिफेन्स मेकॅनिझम आला. घटनांकडे त्रयस्थ वृत्तीने आणि लॉजिकल दृष्ट्या बघण्याचा हा प्रयत्न वास्तविकरीत्या विपरीत घटनांमुळे निर्माण होणारा त्रास कमी करण्याचा मार्ग आहे.

ऑफिसचा राग मुलाला धपाटे देऊन काढणारी आई, हे मी त्याच्या चांगल्या साठीच,त्याच्या पुढच्या आयुष्यात शिस्त लागण्यासाठीच करत आहे असे सांगून intellectualization चा खुबीने वापर करत असते.

कोपर्यात बसलेला 20 वर्षाचा गणेश आता एकदम उत्तेजित झाला होता. “फोडून टाकला पाहिजे हा टीव्ही “असे म्हणत त्याने क्रिकेटची बॅट घेतली पण टीव्ही वर मारण्याऐवजी दाराजवळ बसलेल्या मोती कुत्र्याच्या पाठीत घातली. केकाटत मोती पळून गेला. गणेशने आपला राग जेथे तो काढला जाऊ शकतो अशा ठिकाणी डिसप्लेस् किंवा विस्थापित केला. या मनोसंरक्षक पद्धतीला डिस्प्लेसमेंट असे म्हणतात. सोपी पण अपरिपक्व अशी ही पद्धत! ही पद्धत वापरल्यामुळे क्रिकेट मॅच संपल्यानंतर पाकिस्तानात तोडलेल्या  टी व्ही संचांचा  ढिगारा होतो अशी एक बातमी परवा वाचण्यात आली .

वयाची साठी ओलांडलेले नाना सर्वांना शांत करत पुढे आले.”आपण या पराभवाचे योग्य तऱ्हेने तांत्रिकदृष्टय़ा पृथक्करण केले पाहिजे .यापुढे महत्त्वाच्या सामन्या आधी तांत्रिक आणि मानसिक दृष्ट्या खेळाडू कसे मजबूत राहतील ज्यामुळे असे पराभव होणार नाहीत याचा आपण विचार केला पाहिजे. याशिवाय या निमित्ताने क्रिकेटशिवाय इतर खेळांवर आपण कसे लक्ष केंद्रित करू शकतो याचा पण विचार व्हायला हवा.”

आपल्या मनातील अस्वस्थता नाना सब्लिमेशन sublimation या मनोरक्षक पद्धतीद्वारे  दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत . या मधे मनातल्या ताणाचा निचरा करण्यासाठी हा ताण इतर विधायक गोष्टीमधे प्रवाहित (channelise) केला जातो .हा एक अवघड परंतु परिपक्व डिफेन्स.

आपल्यातील नकारात्मक भावनांचा सामना करताना अनेक कलाकारांनी sublimation च्या रूपाने अनेक उत्तम कलाकृती निर्माण केल्याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत.

या ग्रुपमधील सर्वात तरुण 15 वर्षाच्या चंदू मात्र शांत बसून होता आणि आपल्या बोटाची नखे खात होता.

त्याच्या वागण्याला रिग्रेशन असे म्हणतात .यामध्ये व्यक्ती बालवयात वापरलेले ताण कमी करण्याचे उपाय, तरुण किंवा प्रौढ पणी देखील वापरतो. अटीतटीचा सामना बघणारे कित्येक प्रेक्षक नखे खाताना आपण टी व्ही वर बघत असतोच ना !

या संरक्षण पद्धतींचा वापर आपले मन विपरीत परिस्थितीत देखील संतुलित ठेवण्यास उपयोगी पडतो. व्यक्ती तितक्या प्रकृती! प्रत्येकाची मनोसंरक्षक पद्धत वेगळी! अपरीपक्व मनोसंरक्षक पद्धतीमध्ये कदाचित पुढच्या मानसिक आजाराची बीजे पेरलेली असू शकतात. या पद्धती बदलणे सोपे नाही पण थोड्या मर्यादित बदलणे,modify करणे अशक्य देखील नाही . या मनोसंरक्षक पद्धति तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनलेल्या असतात. काही वेळा समुपदेशनाने या पद्धतीमध्ये थोडाफार बदल केला जाऊ शकतो, पण थोडाफारच!

म्हणतात ना स्वभावाला औषध नाही.आणि मनोसंरक्षणाच्या इम्युनिटीला वाढवण्यासाठी कोणतेही ठोस वॅक्सिन नाही!!!